अलकानंदा घुगे-आंधळे यांचा 'अर्धा कोयता' हा कथासंग्रह नुकताचं वाचनात आला.कथासंग्रहाचे शीर्षकावरून आपला असा समज होतो की,हा ऊसतोड कामगाराच्या जीवनावर अधारित कथांचा संग्रह असेल पण अगदीच तसा नाही तो.या कथासंग्रहात ग्राम्य जीवनाच्या खडतर संघर्षाच्या चटके देणा-या ही अनेक कथा आहेत.
वाटयाला आलेला संघर्ष,खेड्यातील कष्टप्रद खडतर जीवन,दारिद्रय,अज्ञान,मतलबी राजकारण,व्यवस्थेने निर्माण केलेली अनेक आव्हान व त्या आव्हानाला
भिडणारी कमालीची जिद्दी माणसं या सा-या गोष्टींनी लेखिकेचे भावविश्व समृध्द झालेले दिसते आहे.जीवनातील
खडतरता व अभावाची परिस्थिती व त्या परस्थितीने पिचलेली माणसं हीच लेखिकेच्या
लेखनाची मूळ प्रेरणा ठरलेली दिसते आहे.
या कथासंग्रहात ऊसतोड कामगारांच्या जीवनाची परवड व खेडयातील माणसांचा
भयाण संघर्ष या कथामधून जाणवतो आहे.ग्रामीण
भागातील शेतक-याचे,मजुरांचे जगणे केवळ हलाखीचे नसते तर ते सततच्या संकटामुळे
जगण्याचा चंग बांधणा-या माणसाची ती एक लढाईचं असते.हा असंघटित संघर्ष कसा गडद होत जातो याचा वस्तुपाठच या
कथांमधून मांडण्यात लेखिका यशस्वी झालेली आहे.
'आलिया भोगासी असावे सादर'
या तुकोबाच्या उक्ती प्रमाणे आपल्या
वाट्याला जे दुःख आले आहे ते भोगावे लागणार आहे.हे
जगणं त्यांनी स्वीकारलं आहे.या झुंजार वृत्तीने एक एक पात्र लढत राहते आहे.झुंजत राहते आहे.प्रत्येकाची लढाई वेगळी असते. आपलीच जीवा भावाची माणसं एकमेकांचा संघर्ष कठीण करत असतात हे
कटू असलं तरी सत्य लेखिकेन अनेक कथामधून मांडले आहे.
माणसामाणसतील उभे
राहणारे संघर्ष,फाटत जाणारी नाती,विस्कटत
गेलेली कुटूंब,मतलबी राजकारण,बेगडयासारख्या
जपलेल्या अभासी प्रतिमा हे सारं गावातल्या माणसाठी शापच ठरलेले आहे.कुटूंबातील संघर्ष ही माणसाचं जीवन अधिक खडतर करतो.’बगीचा’
कथेतील जना असेल,’आळ’कथेतील
संपत असेल,’यशोदा’ कथेतील यशोदा असेल,’मंगळसूत्र’कथेतील आप्रुगी.’शेवता’ कथेतील शेंवता असेल.अश्या अनेक स्त्रीयांच्या
जगण्याची परवड या कथामधून लेखिका प्रभावीपणे वाचकासमोर मांडत
राहते.लेखिकेच्या भवतालचा पट आपल्या समोरून सरकत जातो
आणि वाचक कथामध्ये गुंतत जातो.
कथामधून नायकपेक्षा जास्त
कथामधून खंबीर नायिका त्यांनी
रेखाटलेल्या दिसत आहेत.अर्थात त्या मध्यम वर्गीय स्त्रीयां सारख्या स्त्रीवादी चळवळीत अडकलेल्या नाहीत तर त्या आपली जगण्याची लढाई लढत आहेत.स्वत:स्त्री
असल्यामुळे अनेक नायिका रंगवण्यात येणे स्वभाविकच आहे. फक्त स्त्रीयांच्या
भावविश्वातच लेखिका गुरफटून गेलेली नाही तर खेडूतांच्या जीवनांच्या अनेक समस्येला
शब्दबध्द करण्याचा प्रयत्न ही तिने केला
आहे.
‘दंश’ कथेतील शारदा,कौटूंबीक संघर्ष वाटयाला आलेली ‘अफवा’ कथेतील सुबी,’छेड’ कथेतील
दुर्गा,’विम्याचे पैसे’ या कथेतील
दारूबाज नव-याशी झुंजत संसाराचा गाडा ओढणारी मुक्ती असेल,वृध्दाश्रम जवळ करणारी ‘यशोदा’
कथेतील यशोदा,’नकोशी’ कथेतील तुळसा,शेंवता,‘अर्धा कोयता’या कथेतील खंबीर कांता,या सा-या कथामधून प्रत्येकीचा संघर्ष वेगळा आहे.खंबीरपणे त्या लढत आहेत.सकारात्मक दृष्टीकोन या सा-याच कथामधून आपल्याला दिसेल.हाच
लेखिकेचा लेखनाचा हेतू ही असेल असं वाटते आहे.
‘आळ’कथेतील नायक संपत,खचून जाऊन
फडच पेटून देणारा ‘फड’ कथेतील भीमा,न संपणारा संघर्ष वाटयाला आलेला‘वळहई’ कथेतील आप्पा,’अफवेचे पीक’नात्याच्या गुतंत्यात अडकलेला हताश
सदा.या सा-या कथाशोंकातिका आहेत पंरतु नकोशी,ईद
का चाँद,भेट,या कथामधनू सुखात्मिका ही
छान रंगवल्या आहेत.जगण्याची उभारी देणा-या या कथा आहेत.
कथेमध्ये
माणसचं नुसते नायक नाही तर बगीचा कथेतील बाग,नख-या कथेतील बैल,शिक्षा कथेतील अख्खा गावातील
स्त्रीयाच नायक म्हणून पुढे येतात. असे आगळे वेगळे पण नायक
लेखिकेन खुबीने उभे केले आहेत.
जसे कडवट झुंज देणारे अनेक माणसं असतात,तसेच खलनायक ही बेरकी
आहेत.या कथा मधून तुम्हाला
प्रत्येकवेळी माणसचं खलनायक म्हणून
भेटतील असं नाही.वास्तवातं
ही तसं असतं नाही. समाज, व्यवस्था, निसर्ग आणि नशीब ही माणासाच्या आयुष्यात अनेकदा
खलनायक ठरत असतात. या कथामधून ही दारिद्र्य,अज्ञान,अंधश्रद्धा व समाज व्यवस्था व राजकारण ही खलनायक म्हणून पेश
होत राहतात.’शिक्षा’ कथेतील खलनायक अख्ख गावच आहे.सामाजिक
विषमताच खलनायक म्हणून पुढे आलेली दिसते.त्यामुळे या कथांना एक सार्वत्रिक सामाजिक परिमाण लाभले आहे.त्यामुळेच अनेक
पुरस्कार पदरात पाडून घेताना अलकानंद घुगे-आंधळे यांची कथा आपल्याला दिसते आहे.
अलकानंदा घुगे-आंधळे यांच्या लेखनाची भाषा अत्यंत सहज आहे.संवाद आणि वर्णने ही
ग्रामीण वास्तवाला धरून आहेत.शब्दयोजना सरळ आणि मोजकीच
आहे.त्यात एक लय सापडते.ती लयचं माणसाला कथा मध्ये गुंतून ठेवते.वाचकांना कथेत गुंतवून ठेवण्यासाठी निवेदन शैली व शब्दसंयोजन
महत्वाचे असते.बोलीभाषाचा वापर
सर्रास केलेला आहे.’आता बया..! महा जीव तुमच्यात आन् तुमचाजीव खेटरात,’’आता
कहयाला बोलीती ती पांढरी पाल,’ ‘लई मस्ती आली का ग टवळे, नांदयाला आले तशी अजून
कोणी नवा जून केला नाही.च्या मायाला झक मारली न कुठून ऊस लावला.अश्या शब्दांची पखरंड
पानोपानी दिसते त्यामुळे संवाद प्रभावी झालेले आहेत.
सा-याच कथामध्ये तृतीय पुरूषी निवेदन शैली आहे.त्यामुळे कथा एक सारख्या वाटतात.एकजीनशीपणा
उतरल्या सारख्या जाणवतात.निवेदनशैलीमध्ये अनेक पर्याय वापरायाला जागा होती पण
लेखिकेने तसं काही केले नाही.
या कथांमधील पात्रे आपले अस्तित्व शोधत जगतात ती नुसती परिस्थितीला शरण जाणारी नाहीत, तर आपल्या हक्कांसाठी लढणारी आहेत.उरातली आग तशीच ठेवून डोळयात उत्तुंग स्वप्न रंगवणारे ही माणसं आहेत.अर्धा कोयता हा केवळ ऊसतोड मजुरांच्या दुःखाची कहाणी नाही, तर त्यांच्या संघर्षाचा,त्यांच्या जिद्दीचा दस्तऐवज आहे. अरविंद शेलार यांच मुख्यपृष्ठ कथांच्या आशयाला साजेसं साधलं आहे.परिस प्रकाशनाने ही आपला जीव त्यात ओतला आहे.आघाडीचे लेखक बाबूराव मुसळे,यांची नेमक्या शब्दांतील प्रस्तावना कथासंग्रहाचे ढाचा सांगून जाते.त्यांची पाठराखण ही आहे.नेमक्या शब्दांत संग्रहाचे सार त्यांनी आस्तिक शब्दांत मांडले आहे. चारचौघात जायचं म्हणल्यावर थोडं सावरून आवरून जायचं असतं.,थोडसं नटून थटून ही..!!अगदी तसचं काहीसं इथं घडले आहे. बुकशेल्पवर उठून दिसेल असा हा कथासंग्रह साधला आहे.
हा कथासंग्रह केवळ
सहानुभूती जागवत नाही, तर वाचकाला त्यांच्या जगण्याचा विचार करायला लावतो.ग्रामीण
जीवन समजून घेण्यासाठी, श्रमिकांच्या जगण्याचे तपशील अनुभवण्यासाठी हा संग्रह वाचायलाच
हवा.साहित्यात वास्तववादी मराठी लेखनाचा ओघ वाढतो आहे. ‘अर्धा कोयता’ हा त्याच धारेतील
महत्त्वाचा टप्पा आहे. लेखिकेच्या शैलीमुळे या कथा मराठी साहित्यात अधिक गडद आणि
परिणामकारक ठरतील.त्या कमालीच्या अश्वासक आहेत.
परिक्षण: परशुराम सोंडगे, बीड
पुस्तकाचे नाव: अर्धा कोयता (कथासंग्रह)
लेखिका:
अलकानंद घुगे-आंधळे
प्रकाशन: परिस पब्लिकशन सासवड,पुणे
1 टिप्पणी:
खूप खूप आभारी आहे सर.. पुस्तके मन लावून वाचन करून त्यावर परखडपणे लिहिणारे वाचक अजूनही आहेत म्हणून आमच्या सारख्यांना लिहायला बळ मिळते..आपले खूप धन्यवाद..आपली प्रतिक्रिया मला एक नवीन ऊर्जा देवून गेलीय..
टिप्पणी पोस्ट करा