युध्दं पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.
'युध्द पेटले आहे 'हा बाळासाहेब नागरगोजे यांचा पहिलाच कविता संग्रह.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेतून अनघा प्रकाशना मार्फत प्रसिद्ध करण्यात आला आहे.तो नुकताच वाचण्यात आला.
पिढयानपिढया वाटेला आलेला संघर्ष व काळजात घर करून राहिलेल्या वेदनांचा परिपाक म्हणजे हा कविता संग्रह आहे.
होरपळत गेलेली स्वप्न,व्यव्स्थेने खुडून घेतल्या गेलेल्या जगण्याच्या आशा,वाटयाला आलेलं दारिद्रय व उपेक्षित जिणं.मराठवाड्यातील ग्रामीण भागातील वास्तव,त्याचे चटके,उपेक्षितांचे प्रश्न,सामाजिक विषमतेमध्ये भरडत गेलेले माणूसपण.जातीवादाचे उसळलेले डोंभ,दांभिक राजकारणात होरपळत जाणारी पण जगण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करणारी माणसे इ.गोष्टीने कवीचं भावविश्व अकारत गेलेले असावं याचा प्रत्ययं आपल्याला कविता वाचतानी सतत येत राहतो.संपूर्ण शोषण मुक्तसमाज हे भगतसिंगाचं स्वप्न उरी घेऊन कवी धडपडतो आहे.तिचं ही कवीची काव्यप्रेरणा आहे असे आपल्याला अनेक कविता वाचताना जाणवते.
या तप्तव्यवस्थेच्या जाळात होरपळून निघताना मनाला फुटलेल्या उकळीला कुठला ताल सूर आणि लय असू शकतो का? अलंकारिक शब्दाच्या व यमकाच्या मोहात बाळासाहेब नागरगोजे यांच्या कविता गुंतून पडत नाहीत.उकळणं जिथं नैसर्गिक तितकचं या कविता पण अकृत्रिम व स्वभाविकचं आहेत.भावनेच्या कल्लेळात अंतरंगातील शब्द उसळत राहतात.ताला सुराचे साज ती लेतं नाही.हल्लीची मराठी कविता कृत्रिमतेच्या अनेक साच्यात अडकून पडू लागली आहे.बाळासाहेब नागरगोजे यांची कविता तसल्या चौकटीत अडकत नाही तर त्या सा-या चौकटीत उलथून प्रकट होणारी आहे.
या कवितात विद्रोह आहे पण ऊरबडवेपाणा नाही.आक्रोश आणि टाहो नाही तर संघर्षाच्या गर्जना त्यात आहेत.आपल्या समोर असलेले प्रत्येक शस्त्र हाती घेऊन पिसाट झालेल्या भणगं माणसाची ही कविता आहे.कवीचे एक एक शब्द शस्त्रप्रमाणे अंगावर कोसळत राहतात.
‘युद्ध पेटले आहे’ हे शीर्षक असलेली कवितेतूनच त्याचा प्रत्ययं येतो.
भगतसिंह आभाळातून अवतरत नाहीत.
तो भयाण प्रतिकूलतेतही
फुटणारा अंकुर आहे.
भगतसिंह म्हणजे फक्त शरीर नव्हे
मृत्यूने ओढून नेलेल्या युगाचा अंत नव्हे.
युगानुयुगे चिरंतन असू शकतात अश्या विचारावर ही कविता बेतत जाते.अभावने व अस्वस्थतेने अकाराला आलेल्या भावविश्वात ही कवी जगण्याचा चंग बांधतो.
‘प्रिय डॉमिनिक’ या कवितेत कवी म्हणतो.
तू मेली असतीस तर
मी झोपलो असतो निंवात
पण हाय !
तू जगायचा निर्णय घेतलास.
आपल्या आईच्या वाटयाला आलेलं जगणं व संघर्षाची या जगात कुठे ही नोंद घेतली जाणार नाही.कष्टक-यांच्या घामाचे रक्ताचे इथे मोल नाही.दखल कुणी घेत नाही.याची खंत त्याच्या मनात आहे.उपेक्षित माणसाची व्यथाचं क्रांतीचे बीज पेरत असते ना?
‘खांडसरीत ढोरमेहनतीने तिच्या अंगावरची
कातडी सोलून निघाली होती.
पण या घटनेची कुठे ही नोंद नाही.’
तिसरा डोळा उघडून महादेव तांडव सुरू करतो.जग विनाशाच्या बिंदूवर असते.तेव्हा जग हादरत.युगालाचं आपले युगपुरुष उभे करण्याची अपरिहार्यता असते.ते होणारच असते.ती सृष्टीची ही अपरिहार्यताचं असते.
'या क्रांती मार्गावरचा मुसाफिर म्हणून
मी पहिला नव्हतो
आणि शेवटचा ही नसेल..!!
परिवर्तन ही विश्वाची अटळता आहे तसेच शोषणाची वंशावळ ही युगानुयुगे तशीच चालत आलेली आहे.
हि विषवल्ली आजची नाही रे
युगानुयुगे ती फोफावत आलेली आहे.
ज्यांनी ब्रिटनला,जाॅन ऑफ आर्कला रसरसत्या आगीत लोटले.क्रॉसवर्ड जीससच्या हातावर खिळे ठोकले.सत्य सांगणा-यांच्या डोळ्यांच्या खाचा केल्या....
खिचपत पडणे,पिचून जाणे, तुटणे. वाकणे किंवा मोडणेचं मान्य नसलेला प्रचंड आशावाद पाानोपानी पेरत जाणा-या या कविता आहेत.
समग्र क्षेत्रात सुरू झालेला संघर्ष कवी विशद करतो.युध्दाचा शेवट काय असेल याची फिकीर सैनिकाला नसते.जग बुडाले तरी त्याची त्याला पर्वा नसते.
युध्द अटळ असते.ते कुणी लादत नाही.लादून घेत ही नाही.समाजात स्वार्थ पिपासू,सत्ता पिपासू लोक फसवे मुखडे घालून वावरतात.
धर्माच्या जातीच्या गुंगीत ठेऊन माणसाला धूंद बनवतात.ती धूंदी माणसाचा मेंदू बधिर करते.
भकास मराठवाडय़ातील कंगालत्व ते आपल्या प्रखर शब्दातून मांडत राहतात.
चोहीकडून घेरलेले असले तरी कवी हताश होत नाही.तो सर्वांना आव्हान करतो.गस्त जागी ठेवा.
अंधाराच्या उरावर काठी आपटत पहाटेची स्वप्न पाहणारा नायक या कविता मधून तो उभा करत राहतो.
फक्त
सत्तेच हस्तांतरण
म्हणजे स्वातंत्र्य नव्हे
लढा संपलेला नाही.
स्वातंत्र्य अजून मिळालेले नाही.
कविता मध्ये शब्द संयोजन कवीच्या समृध्द अनुभव विश्वाचं व वाचनाची फलनिष्पती आहे. राजकीय फसवणूक आणि माणसातील माणुसकी हरवत चाललेला काळाच्या पाठीवर ही कविता आपले ओरखडे ओरखडीत पुढे सरकते आहे.
‘पुढच्या युध्दाच्याच
गर्भधारणेचा मोसम असते
इतिहासाचे गाढव
पुन्हा त्याचं चौकात तसेच ओसाड उभे आहे.’
या संग्रहातील कविता शोषण,अन्याय, क्रांती आणि सामाजिक परिवर्तनाच्या धाग्यांभोवती गुंफलेल्या आहेत.कवीच्या लेखणीतून व्यक्त होणारे विचार हे केवळ वेदनांचे वर्णन नसून संघर्षाच्या गर्जना आहेत.परिस्थितीस शरण जाणारी नाहीतर ती या व्यवस्थेविरूध जंग पुकारणारी कविता आहे.हे युध्द शोषकाच्या विरोधात शोषितांनी पुकारलेले आहे.यातून श्रमिकांचे जगणे आणि त्यांच्या दुःखाची खोल समजूत प्रकट होते.कवी आपल्या' चक्रव्यूह' या कवितेत आपल्या मनाची पराकोटीची अस्वस्थता आपल्यापुढे मांडत राहतो.
'माझ्या दारातनू रक्ताचे पाट वाहत असताना
मी मनशंतीसाठी नाही प्रयत्न करू शकत
ते रक्ताचे पाट रूंद होत जातात त्यांची उंची वाढत जाते
आणि ते थेट माझ्या पायाला स्पर्श करतात
तेव्हा मी लेखणी उचलतो
पाझरत राहतात काळजातून
साचलेल्या माझ्या वेदना.
कवी समाजव्यवस्थेतील ढोंगीपणावर घणाघाती टीका करतो.
बाळासाहेब नागरगोजे यांच्या कवितेची भाषा ही सरळ, साधी नाही ती गुढ आहे अंशत: अबोघ आहे.पण अत्यंत प्रभावी आहे.ती कुठेही अलंकारिक शब्दांच्या शोधात गुंतलेली नाही,तर ती अधिकची धारदार होत गेलेली आहे.
मुक्तछंदातील सहजशैली,आक्रोश आणि विद्रोहाचा सूर,बोलीभाषेतील थेट संवाद
संस्कारांची जाणीव,सामाजिक विसंगतीवर तिरकस आणि प्रखर विद्रोह ती करत राहते.
‘तुला माहितीये?
आपल्या आयुष्याचे बांधिल गि-हाईक उरावर घेत
माझ्यातील वेश्या
खंगत चाललीये.’
त्यांची कविता वाचताना जाणवतं की, हे शब्द कुठल्याही लयीत बसवलेले नाहीत, तर ते युद्धात उचललेली शस्त्रं आहेत.ते कुठेही सौंदर्याच्या चौकटीत अडकत नाहीत,कारण त्यांचा उद्देश मनोरंजन नाही,तर परिवर्तन आहे.
"युद्ध पेटले आहे" हा संग्रह समकालीन मराठी साहित्याच्या विद्रोही धारेतील एक आहे.पारंपरिक कवितांप्रमाणे ही कविता निसर्ग, प्रेम,भक्ती यांसारख्या विषयांभोवती फिरत नाही तर समाजाच्या गाभ्यातील दुःख आणि संघर्षाच्या खोल तळाशी जाऊन भाष्य करते. माणसाच्या मनात राखेत गुडूप झालेल्या निखा-यावर ती फुंकर घालते.गुलाम या कवितेत कवी म्हणतो.
’खूप प्रिय असतात
त्यांना गुलाम.
गुमान काम ऐकणारे सांगकामे
कवींच्या कविता जशा तत्कालीन समाजातील दुःख प्रतिबिंबित करतात,तश्याचं मनाच्या गाभा-यात खोल तेवत असणा-या घटना,व्यक्ती व भवना अपोआपच बाहेर येत राहतात.
साळू काकू,सुंदरा अक्का ,आण्णा,तुम्ही गेल्यानंतर आणि रददी या सारख्या कविता मनाच्या तळाशी चाललेला कोलाहलचं फक्त प्रकट करत नाहीत तर युक्रेन,इस्त्रायलचे युध्द सारख्या जागतिक घटनावर ही आपल्या संवेदाना प्रकट करत राहतात.त्यामुळेचं कवितेंचा पट विस्तारात जातो.
नामदेव ढसाळ यांच्या विद्रोही साहित्याची आठवण या कविता वाचतानी येते.काही अंशी नामदेव ढसाळ यांची जी अस्वस्थता कवितेतून जाणवत राहते.एक भणगता ही भाषाशैलीत जाणवत राहते.या कवीच्या कवितेची उग्रता आणि वास्तवदर्शी भाषा प्रभावी वाटते.बाळासाहेब नागरगोजे यांच्या कवितेत आशावाद आणि क्रांतीची भाषा आहे.हा संग्रह केवळ संवेदनशील वाचकांसाठी नाही,तर तो संघर्ष करणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसासाठी प्रेरणादायी आहे.हे कवितासंग्रह वाचल्यानंतर एक निष्क्रिय वाचकही विचार करायला लागतो, आणि हाच या कवितांचा सर्वात मोठा प्रभाव म्हणता येईल.
ही कविता केवळ तक्रारीत अडकलेली नाही,तर संघर्षाला प्रवृत्त करणारी आहे.केवळ व्यक्तिगत दुःख मांडत नाही, तर संपूर्ण समाजाच्या वेदनांची साक्ष देणारी आहे पंरतु विद्रोह,अक्रोश व संघर्षानेच या कविता भरावलेल्या आहेत.त्यात मानवी जीवन सुखच्या आशेवरचं पुढे सरक असते.मानवी जीवनातील सुखाचा जो पदर असतो.तो कुठे ठळकपणे पुढे येत नाही.भाषाशैलीत सहजताव सुलभता नाही.कधी कधी आशय फारच गुढ होत जातो व कविता अबोधाच्या चकोरीत फिरत राहते.
कवीने पहिल्या प्रयत्नातच संघर्षशील,आक्रमक आणि परिवर्तनवादी कविता साकारल्या आहेत. त्यामुळे हा संग्रह मराठी साहित्याच्या विद्रोही परंपरेत एक नवीन आणि मजबूत आवाज म्हणून पुढे येईल यात शंका नाही.
साहित्या अकादमी पुरस्कार प्राप्त कवी विरा राठोड यांची पाठराखण व कवी अनंत कराड यांची प्रस्तावना या संग्रहाला लाभलेली आहे ही या संग्रहासाठी मोठी उपलब्धी आहे.मोजक्या शब्दात त्यांनी कवीच्या भावविश्वाचा व कवितेचा आशय व्यक्त केला आहे. मुखपृष्ठ ही वेगळया धाटणीचं असलं तरी प्रभावी आहे व संग्रहातील कवितांवर ते चपखल बसलं आहे. सुभाष कुदळे,यांनी ते चित्तारले आहे तीची भाषा असली तरी एकदम उचच्तम काव्यानुभूती देणारा हा कवितासंग्रह सर्वांनी वाचायलाच हवा असा आहे.
वाचताय ना?
पुस्तकाचे नाव:युध्द पेटले आहे
कवी : बाळासाहेब नागरगोजे
प्रकाशन : अनघा प्रकाशन, ठाणे
परशुराम सोंडगे,बीड
9527460358
1 टिप्पणी:
खूप छान विवेचन केले आहे काव्यसंग्रहाचे.
टिप्पणी पोस्ट करा