शनिवार, २१ डिसेंबर, २०२४

आपण सारे पागल ठरतो तेव्हा...!!!


संसद हे आपलं सर्वोच्च सभागृह आहे.भारतात  संसदेपेक्षा सर्वोच्च असं काही  ही नाही.असं मी नागरिक शास्त्राच्या पुस्तकात शिकलेलो आहे. नागरिकशास्त्र शिकवणारे आमचे शिक्षक भारी शिस्तीचे होते.ते आमचे हात फोडून काढत पण नागरिकाची सनद ,कर्तव्य व अधिकार असल्या गोष्टी पाठचं करून घेत असतं.
एखादा अधिकार आपण त्यांना  सांगितला की ते त्याचं कर्तव्यं विचारतं त्यांच म्हणणं स्पष्ट  असे अधिकार आणि कर्तव्य  हया नाण्याच्या दोन बाजू आहेत.नागरिक आपले अधिकार  मागतात पण कर्तव्य मात्र जाणूनबुजून विसरतात.सुजाण  नागरिक  तोच जे कर्तव्य  विसरत नाही.

                           आम्हास कर्तव्य  सांगता नाही आले की ते चड्डी ओली होई पर्यंत बेजरब मारत असतं.त्यावेळी  सुजाण आणि सजग पालकांच्या टोळया नसतं.त्यामुळे शिक्षकांना आवरायला कुणी नसे.शिक्षणात ही आंनदायी शिक्षण हा प्रकार  तेव्हा सुरू झालेला नव्हता.
जेव्हा मी इतिहासात हिटलर नाव ऐकलं तेव्हा पासून मी त्या सरांना हिटलर समजत असे. ते हिटलर सारखचं वागतं. दिसतं पण.
लोकशाहीच्या धडे देणा-या माणसांनी हिटलर असू नाही अशी माझी अपेक्षा असे पण माझ्या सारख्या गुलामांच्या मताला काहीच किंमत नसे.
बरं मला वाटतं ते तरी व्यक्त होण्याची हिम्मत  माझ्याकडे तरी कुठे होती?कुणाकडेच नव्हती.त्यामुळे गुलामाच्या अपेक्षेला काहीचं महत्व  नसतं.हे सत्य कळायला मला पन्नाशी गाठावी लागली.
नागरिकशास्त्रा शिकवणा-या हिटलरी शिक्षकामुळे मला लहानपणापासून  संसद या शब्दात विषयी कमालीची जिज्ञासा आणि  जिव्हाळा वाटतं आलेला आहे.
संसदेवर दोनदा हल्ले झाले होते तेव्हा पण मी फार भावूक झालो होतो.भावूक होण्यापेक्षा फार भयभीत  झालो होतो.संसदेवर ॲटक म्हणजे काय जोक्स काय? 
आपल्याला वाटतं किंवा कळतं हे सार तसचं असतं असं नाही.खरं तर फारचं भयंकर असतं कधी कधी.आपल्याला काहीचं कळतं ही नसतं. आपण पागल असतो याचा साक्षात्कार  काही घटना आपल्याला करून देतात.
कालपरवा जे संसदेमध्ये घडलं.ती अशीच एक देश वासियांना अक्कल शिकवणारी घटना होती. संसद हे सर्वोच्च  सभागृह  वगैरे काही नसतं. तो एक आखाडा असतो.कुस्त्या खेळायच्या असतात तिथं.झोंबाझोंबी खेळायच्या असतात.नाहीच समोरची गडी रेटले की महिलांना पुढे करायचं.पुढं किती गडी शटकरं असले तरी महिलांना काय करणार? कुणाच्या बांगडया फोडून तुम्ही काय पौरुषत्व  सिध्द करणार?
कसली चर्चा कसली! कसली अर्चा .!!
आज मला भयंकर राग आला आहे.
कुणाचा काय म्हणून विचारता ?त्या नागरिकशास्त्र  शिकवणा-या त्या आमच्या शिक्षकाचा. फुकटातचं त्यानं आमचं हात फोडलं.चड्ड्या ओल्या केल्या.
संसद अशी पण असते हे आम्हा पामराला कुणी शिकवलं नाही.
 हे बरोबर नाही.अध्यक्ष  महोदय...!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

खाजगी दवाखान्यांची लूट आणि सरकारी रुग्णालयातील बेफिकिरी – एक सखोल विश्लेषण

  माणुसकीचा आटलेला झरा: खाजगी दवाखान्यांची लूट, सरकारी रुग्णालयांची बेफिकिरी आणि आरोग्य व्यवस्थेतील विसंगती Keywords (शोधशब्द): खाजगी दवाख...