भावस्पर्श ..
एक स्पर्श जेथे बालविवाह रोखल्या जाते आणि शाळाबाहय मुलांच्या शिक्षणासाठी जेथे माणुसपण जपल्या जाते.जि.प. कें. प्रा. शाळा पाटोदा च्या आदर्श शिक्षिका सुरेखा खेडकर ताईंची त्या स्वतः दिव्यांग असूनही कौतुकास्पद असे शैक्षणिक कार्य केले आहे .
2011 सालच्या जनगणने मध्ये गावकुसाबाहेर स्मशानभूमीत रहाणारा पिढ्यानपिढ्या अज्ञान आणि कमालीच्या अंधश्रध्देत दररोज भीक मागून आणि कधीतरी एखाद्या मृत व्यक्तीच्या राखेतून मिळणाऱ्या गुंजभर दागिन्यावर आपली उपजीविका भागवणाऱ्या 'मसनजोगी' समाजातील मुलासोबत झाली.
त्याच कालावधीत एकाच कंपाऊंडमध्ये 5-6 शाळा असल्यामूळे त्यांच्या शाळेची कमी होणारी विद्यार्थीसंख्या ही एक मोठी समस्या झाली होती. मसनजोगी समाजातील ती सर्व मूले शाळाबाह्य होती.या ठीकाणी कर्तव्य आणि गरज एकत्र आली. सुरेखाताई व सहकारी मिळून मूलांना शाळेत पाठवण्यासाठी त्या पालकांना वारंवार विनंती करु लागले पण पालक तयार होत नव्हते.शेवटी मुलांना दररोज रिक्षाने शाळेत घेऊन जाऊ यावर पालक तयार झाले. सुरुवातीला 10 मूले शाळेत येऊ लागली. महिना पंधरां दिवसात मुलांची संख्या वाढू लागली. दररोज वेगळेगळी मूल शाळा पहायला येऊ लागली.शाळेच्या वातावरणाचे निरक्षण करु लागली. शाळेत रमू लागली. मग RTE नुसार या मूला -मुलींना वयानुरूप वेगवेगळ्या वर्गात प्रवेश तर दिले पण सर्वात मोठी अडचण होती ती भाषेची. आपली भाषा मराठी आणि त्यांची भाषा तेलगू.कोण काय बोलेतय हेच कळत नसायचं. दररोज सकाळी उठायचं आणि दारोदार भीक मागून मिळेल ते खायचं. दिसेल ते भंगार वेचायचं,हेच त्यांना माहित होत.
अंघोळ करणे, स्वच्छ राहाणे त्यांना माहितच नव्हतं. शिस्त हा शब्दही त्यांना माहिती नव्हता. शिक्षकांना आदराने बोलायच असत हे ही त्या मुलांना माहित नव्हतं. आपापसात भांडण करन,शिव्या देणं, गोंधळ करणं, यामूळे त्यांच्यावर कधी कधी त्या रागावायच्या. तर ते खुशाल त्यांना त्यांच्या भाषेत शिव्याही द्यायची. पण सुरेखाताई आणि त्यांचे सहकारी मुलांची मानसीक स्थिती समजून घ्यायची. त्यांना समजून घ्यायची पण या सगळ्याचा भयंकर परिणाम म्हणजे शाळेमध्ये आधीपासून शिक्षण घेणारी 'मूलं शाळा सोडून दुसऱ्या शाळेत जाऊ लागली. या मुलांमूळे सर्वसामान्य घरातील पालक त्यांची मुले त्यांच्या शाळेत मुलांना पाठवत नव्हते.पण मसनजोग्यांची मूलं मात्र न चुकता शाळेत येऊ लागली.
कित्येक दिवस न धुतलेली त्यांची डोकी पण त्यावर ताईंचा आपूलकीने हात फिरू लागले. केसांचा झाप असलेल्या मुलींच्या त्या शाळेत वेण्या घालु लागल्या .हळूहळू मुले त्यांची भाषा समजू लागली. स्वच्छतेच्या सवयी लागू लागल्या,भिक मागणारी मुले पण शाळेच्या ड्रेसमध्ये गोंडस दिसू लागली. भाषेमुळे वर्गात शिकवतांना खूप अडचणी येत पण ताई व सहकार्यांनी प्रयत्न सोडला नाही. हळूहळू मुलांना शाळा शिक्षक आणि परिसर आपला वाटू लागला, मूलांना शिक्षकांचा लळा लागू लागला. शिक्षक आपली काळजी घेतात आपल्याला जीव लावतात हे लक्षात आल्यावर त्यांना शिक्षकांविषयी विश्वास आणि आपूलकी वाटू लागली. मग भाषेची देवाणघेवाण सुरु झाली. गप्पा गाणि गोष्टी रंगू लागल्या. त्यांनी भिक्षेचे आणलेले अन्न पाहून ताईना वाईट वाटे, इतर मुलं डबा खात असतील तर या निरागस मुलांच्या अधाशी नजरा डब्यावरच असायच्या मन कळवळायचे मग तेव्हा त्या त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असत. शाळेच्याच पोषण आहाराचा त्यांच्या डब्यामधून ताई देखील खात असत .तेव्हा त्याना ताई म्हणजे त्यांच्यातील एक असल्याचा भाव त्यांच्या चेहर्यावर निर्माण होई. मुलांना चांगले रुळण्यासाठी एक दोन वर्ष गेली. मूलं आता शिकू लागली होती ,अक्षर गिरवू लागली होती,शब्द वाचू लागली होती, चित्र काढू लागली, गणित सोडवू लागली, गाणी म्हणू लागली, इतर सर्वसामान्य घरातील मूलं आणि मसनजोग्याची मुलं यांच्या मधले अंतर कधी संपून गेलं ते कळलेच नाही.एखाद्या दिवशी मूलं शाळेत नाही आली तर ताईंची पावलं आपोआप त्यांच्या वस्तीकडे वळायची. बघता बघता हा प्रवास दहा वर्षाचा झाला. गेली दहावर्ष दररोज दोन रिक्षा मुलांना ने आण करण्यासाठी आहेत त्याचा प्रत्येक माहिन्याचा खर्च ताई व सर्व शिक्षक बांधव मिळून करतात. यामधून काहीतरी चांगले घडते आहे याचे समाधान त्यांच्या शिक्षक बांधवांच्या चेहर्यावर झळकते.... पिढ्यानपिढ्या शिक्षणाचा कसलाच गंध नसणाऱ्या मसनजोगी समाजाची मूलं सातवी पास झाली खरी पण त्यांना या शाळेतून जाव अस वाटत नव्हत. खूप समजावलं दुसऱ्या शाळेत प्रवेशही मिळवून दिला पण कदाचीत या शाळेत ताईंची .मिळणारी मायेची उब आणि आपलेपणा त्यांना इतर शाळेत मिळत नव्हता की काय कुणास ठाऊक ? मुलांच मन तिथे रमेना . मूलांनी आणि मूलींनी शिक्षण घेण सोडलं. म्हणून ताईंनी शाळेत इयत्ता आठवीचा वर्ग चालू करण्याचा प्रयत्न केला.सहा महिने मूलं शाळेत आली .पण दुर्दैवाने आठवीच्या वर्गाला जि.प. ची मान्यता न मिळाल्यामूळे मुलांचे दाखले देऊन इतर शाळेत जाण्यास सांगीतले. हे सगळंकाही सुरु असतांना आणखी एका मोठ्या समस्येला तोंड द्याव लागलं ते म्हणजे 'बालविवाह' . तिसरी चौथीच्या मुलीचे लग्न जमलेले असणे साखरपूडा झालेला असणे अशी भयाण परिस्थिती. कायद्याचा धाक दाखविण्या पेक्षा आपण जर यांची समजूत काढून सांगितले तर परिस्थीतीत बदल होवू शकेल
असे ताईंना वाटले म्हणून त्यांनी तसा अनेकदा प्रयत्न केला. पण 16 - 02 - 2021 या दिवशी एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल पाच अल्पवयीन मुलींची लग्न करण्याची संपूर्ण तयारी झाली होती लक्ष्मी, शंकुतला, शालू,पूजा, रेणूका अशी मुलींची नावं. या पैकी दोघींचे वय 13 वर्ष एकीचे,साडे 13, आणि दोघींचे 15 वर्ष वय . माहिती कळताच ताईआणि पोलीस त्यांच्या वस्तीवर पोहोचले. त्यांना खूप समाजावलं आणि नाहीच ऐकलं तर कायद्याने गुन्हे दाखल करावी लागतील हे सांगीतल ,तेव्हा ताईंच्या समुपदेशनाचा फायदा झाला. नाविलाज म्हणून पालक लग्न न करण्यास तयार झाली.
आज हा अनर्थ टळला पण याच्या मूळाशी जाणे गरजेच होत. तुम्ही मुलींची लग्न करण्याची घाई का करता? मुलींना शिकू द्या. 18 वर्ष वय पूर्ण होऊ द्या असं सांगितलं तेव्हा काही वयस्क पालक बोलते झाले... आम्ही उघड्यावर राहतो. काम धंद्यासाठी बाहेर जावे लागते . मग आम्हच्या मूली सुरक्षीत नसतात. संडास ची सोय नसते,अंघोळीची सोय नसते, रहायला घरं नाही म्हणून मूलींची लग्न लवकर करतो. शिक्षणावर त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या ऐकून त्या सुन्न करून गेल्या. त्यांच म्हणन होत की , 'आमच्या मूली या मॅडमच्या शाळेत असतात तोवर आम्हाला काळजी नसते ,आम्हच्या लेकरांचा आणि आमचा सुरेखा ताईवर विश्वास आहे . ही शाळा संपली की मुलींच शिक्षण पण संपल !आम्ही दुसर्या शाळेत मुलींना नाही पाठवणार ,मॅडम तुम्ही तुमच्या शाळेत पुढील वर्ग सुरु करा तरच आमच्या मूली शिकतील... ' हे ऐकून काय बोलावं आणि काय करावं तेच कळेना , क्षणभर आपण हतबल असल्याची जाणीव मन सून्न करून गेली...गेली कित्तेक दिवस लोक ताईच्या शाळेला भिकाऱ्याची शाळा आणि त्यांना भिकाऱ्या मुलाची शिक्षीका म्हणून हिणवायचे. कुणी लवासा सिटीचे विद्यार्थी म्हणून चिडवायचे. याकडे त्यांनी कधीच लक्ष दिलं नाही. त्या अपंग दिव्यांग आहेत. त्यांनी अनेकांनी सल्ला दिला की तुम्ही मागाल ती शाळा तुम्हाला मिळेल, दुसऱ्या शाळेसाठी काम कराल तर लोक तुम्हाला डोक्यावर घेतील. तुमच्या कामाचं चिज हाईल. त्यांचे MA Bed पूर्ण आहे त्यांनी दुसरीकडे जावं लागेल म्हणून पदविधर स्वीकारले नाही कारण त्यांना माहिती आहे की त्या या शाळेमधून गेल्या तर ही मुलं देखील शाळेपासून दुरावतील.त्या हे सगळं करतात तर ती त्यांची जबाबदारी व कर्तव्य समजून करतात .ना कोणत्या सन्मानाची ना कोणत्या पुरस्काराची त्यांना अपेक्षा आहे. 2011 पासून त्यांच हे काम अविरतपणे सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात वस्तीवर जाऊन त्यांनी शिक्षणाचे धडे देण्याचा प्रयत्न केला. या मुलांशी त्याचे एक अतूट नाते तयार झाले आहे. ही मूल त्यांच्यापासून दूर जाऊ नाहीत म्हणून त्या प्रयत्न करतात.हे सगळं तुम्हच्या पूढे मांडण्याचा एकच स्वार्थ की आज समाजात कोरोना संकटामुळे निर्माण झालेला अस्ताव्यस्तपणा आणि त्याची सावरासावर करतांना गोरगरीब पालकांची होणारी दमछाक.या सगळ्या परिस्थतीला बळी पडली ती ही लहान लहान मूल. आज अनेक ठिकाणी आपल्याला हे संकट जाणवत आहे अजून एकदा काही मूल शिक्षणा पासून आणि शाळेपासून दूर गेली आहेत. त्यांना पून्हा प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्रातील संवेदनशील शिक्षकांना ताईच्या ह्या कार्यामूळे प्रेरणा मिळतील आणि एक नव्हे तर हजारो सुरेखा ताई सारख्या शिक्षिका बालरक्षक म्हणून निश्चितच पुढे येतील .
अशा या अवलिया व्यक्तिमत्वाला बालरक्षक चळवळी कडून मानाचा मुजरा !
शब्दांकन:- विनोद राठोड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा